जळगाव : पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चोरी करणाऱ्या दोन टोळींचा पर्दाफाश करत त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई प्रेरणा इंडस्ट्रीज या कंपनीतील चोरीत तीन लाख तीन हजार रुपये किमतीचा तांब्याच्या व अल्युमिनियमच्या वायरिंग, इलेक्ट्रिक मोटर फिट कंट्रोलर पॅनल, लोखंडी पॅनल, बीम रोल, गेअर बॉक्स आणि ट्रांसफार्मर चोरीला गेले होते. या चोरीच्या घटनेचा तपास करत, एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत, आकाश सुरेश शिंदे आणि पृथ्वीराज उर्फ बऱ्या बच्चन बागडे यांना 9 फेब्रुवारी रोजी अटक केली. यांच्याकडून एक लाख 11 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या घटनेत, महालक्ष्मी पुणी एक्झिम या कंपनीमधून चोरी झाल्या असून यामध्ये प्रकाश उर्फ गिड्डा राठोड आणि गोविंदा उर्फ लंबा देविदास ढालवाले यांना 10 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 35 हजार रुपयांपैकी 22 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या फरार असलेल्या तिसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या चोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश करण्याचे आदेश दिले होते. यानंतर, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश घुगे आणि इतर पोलिसांनी या कारवाईत महत्त्वपूर्ण योगदान दिले. तपासकार्य अद्याप सुरू असून, पोलीस यापुढे देखील आरोपींच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत.