जळगाव : शेतातील विद्युत खांबावर वीज तारा चोरणाऱ्या परराज्यातील टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश करत तिघांना अटक केली आहे. या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवज व दोन लाखांची कार जप्त केल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील दीड महिन्यांपासून मागावर असलेल्या पथकाने विविध भागातील ४४ गुन्ह्यांची उकल केली. रावेर, सावदा, फैजपूर, यावल, मुक्ताईनगर या भागातील शेतातील विद्युत खांबावरील वीज तारा चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या गुन्ह्यांच्या तपासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल तायडे, गणेश वाघमारे, पोहेकॉ महेश महाजन, नितीन बाविस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, ईश्वर पाटील, बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रमोद ठाकूर या पथकाला सूचना देण्यात आल्या. विद्युत तारांची चोरी मध्यप्रदेशातील नुरा मोरे व अनिल भेरसिंग मंडले यांच्या टोळीने केल्याची माहिती गुप्त माहिती पथकाला मिळाली.
या पथकाने सापळा रचून तार चोरी करताना नुरा केरसिंग मोरे (३५, रा. झिरपांझऱ्या, जि. बऱ्हाणपूर) याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचे साथीदार तेथून पसार झाले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने रावेर, फैजपूर, यावल या भागातील ४४ ठिकाणी चोरी केलेल्या कबुली दिली.
टोळीतील मुख्य संशयित मोरे याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला खाक्या दाखविताच त्याने त्याचा शालक अनिल भेरसिंग मंडले, संजू चमार वास्कले (दोघ रा. परचुड्या, म. प्र.) दिना मोरे, सावन उर्फ पंडू मोरे (दोघे रा. निलीखाडी, म. प्र.) यांच्यासोबत केल्याचे सांगितले. त्यांनादेखील पथकाने ताब्यात घेतले.
नुरा मोरे हा गेल्या काही वर्षांपासून मुक्ताईनगरजवळील अंतुर्ली फाटा येथे सालदारकी करीत होता. त्यामुळे त्याला संपूर्ण भागाची माहिती होती. दिवसभर सालदारकी केल्यानंतर तो रात्री त्याच्या साथीदारांना बोलावून चोरी करीत होता. चोरीसाठी जाण्यापासून ते गावाकडे जाईपर्यंत ही टोळी आपला मोबाईल बंद करुन ठेवत होती. चोरलेली तार वाहनात टाकून ते रावेर येथील भंगार विक्रेता यासीन हुसेन खान (४२, रा. रावेर) याच्याकडे विक्री करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार भंगार विक्रेत्यालादेखील अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास करीत रावेर पोलिस ठाण्यातील २२, यावल पोलिस ठाण्यातील १४ तर निंभोरा आणि फैजपूर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी चार अशा एकूण ४४ गुन्ह्यांची उकल केली.