जळगाव : शहरातील एका चहाच्या टपरीवर गुंडांनी एका बँक कर्मचाऱ्याला मारहाण करत जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चौघांविरुध्द रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शास्त्रीनगर भागात एक ३३ वर्षीय बँक कर्मचारी रात्री १० वाजता एका चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी आलेल्या चार जणांनी काही जणांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी काही जणांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. बँक कर्मचारी देखील त्या ठिकाणाहून घरी जाण्यास निघाला असतानाच, काहीही कारण नसताना संबधिताशीही त्या चौघांनी वाद घातला.
बॅंक कर्मचाऱ्याने यास विरोध केला असता त्यास चौघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. चौघांपैकी एकाने लोखंडी रॉडनेही मारहाण केली. यात बँक कर्मचाऱ्याला जबर दुखापत झाली. मंगळवारीच मध्यरात्री बँक कर्मचाऱ्याने चौघांविरोधात रामानंद नगर पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार आदेश सपकाळे, भावेश सपकाळे, भोजराज पवार (रा.शिवाजीनगर) व तेजस हटकर (रा.समतानगर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रविण जगदाळे हे करत आहेत.