Jalgaon Crime : पॉलिसी काढण्यासाठी दिलेल्या कागदपत्रांवर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला जामीनदार लावून फसवणूक केल्याप्रकरणी श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा मॅनेजर विवेक बिरे (रा. जळगाव) याने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
यावल येथील मेडीकल व्यावसायिक प्रशांत कासार यांनी श्रीराम लाइफ इन्शुरन्स कंपनीचे एजंट मुकेश पाटील यांच्याकडे लाईफ पॉलिसी काढण्यासाठी त्यांनी मागणी केल्याप्रमाणे आधार कार्ड, पॅन कार्ड व आयटी रिटर्नसह इतर कागदपत्रे दिली होती. परंतु ती कागदपत्रे मोमीन शेख तौसिफ शेख कामील याला जामीन अर्जाकरिता जोडून दिली.
प्रशांत कासार यांना नोटीस मिळाल्यानंतर हा प्रकार उडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर श्रीराम चिट्स फंड प्रा. लि. कंपनीचा व्यवस्थापक विवेक बिरे (रा. जळगाव) व एजंट मुकेश पाटील यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. व्यवस्थापक विवेक बिरे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
त्या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे यांच्या न्यायालयात युक्तिवाद झाला. यामध्ये जिल्हा सरकारी वकील वकील ॲड. सुरेंद्र सुरेंद्र काबरा यांनी तपासाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांचा आधार घेत जोरदार युक्तिवाद करीत हा चिट्स फंडच्या नावाखाली अपहार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मॅनेजर बिरे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तक्रारदारातर्फे ॲड. मिलिंद पाटील, ॲड. अजय कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.