---Advertisement---
Jalgaon Crime : गोलाणी मार्केट परिसरातून टेम्पोसह जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेला होता. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज अभ्यासून शहर पोलिसांच्या दोन पथकांनी तपासाचे चक्र फिरविले. बुलडाणा जिल्ह्यात चोरुन नेलेला टेम्पो अपघातग्रस्त अवस्थेत दिसला. हे वाहन सोडुन संशयित पसार झाले होते.
पोलिसांनी संशयितांना वडनेर भोईजी गावापासून काही अंतरावरील ढाब्यावर ताब्यात घेतले. संशयितांनी सात चोरीची वाहने पथकांना काढुन दिली. जनरेटर वाहन, छोटा हत्ती, पाच दुचाकी असा एकूण सुमारे २ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. शहरातील गोलाणी मार्केटच्या समोर मायटी ब्रदर्स दुकानासमोर पार्किंग केलेला ६१ हजार किमतीचा टेम्पो (एमएच १९ एस ०६६६), तीस हजार रुपये किमतीचे जनरेटर असा मुद्देमाल सोमवारी (१४ जुलै) चोरुन नेला होता.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी गोलाणीपासून सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज उपलब्ध करुन ते तपासले. टेम्पो कोणत्या दिशेला नेला, याचा शोध घेतला. वरिष्ठांच्या सुचनेनुसार दोन पथके तपासकामी तयार केली. पथकातील कर्मचाऱ्यांना वाहन चोरीसंदर्भात गोपनीय माहितीही मिळाली. संशयितांनी नेलेल्या मार्गानुसार पथक मार्गे जामनेर, बोदवड मलकापूर नांदुराकडे खाना झाले.
दरम्यान संशयितानी नेलेला टेम्पोचा वडनेर भोईजी गावाजवळ अपघात झाला. त्यामुळे हे वाहन सोडुन संशयित घटनास्थळापासून पसार झाले. पथकाने हे वाहन ताब्यात घेत संशयितांचा परिसरात तपास घेतला असता एका ढाब्यावर दोन संशयित बसलेले पथकाच्या नजरी पडले. त्यांच्या अंगावर जखमा पाहताच पथकाने दोघांना ताब्यात घेत विचारपूस केली. मंगेश सुनील मिस्तरी (वय २०, ह.मु. शिरसोली) यश अनिल सोनार (वय २०, हमु ओमनगर – शिरसोली) अशी संशयितांनी नावे – सांगितली. टेप्पो व जनरेटर चोरीची दोघांनी कबुली दिली. तसेच चोरीच्या पाच दुचाकी काढुन दिल्या. पथकाने या कारवाईत टेम्पो जनरेटर चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाच, याशिवाय जिल्हापेठ हद्दीतील तीन, एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यातील एक असे सात गुन्हे उघडकीस आणले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे स. फौ. सुनील पाटील, हवालदार उमेश भांडारकर, हवालदार सतीश पाटील, हवालदार नंदलाल पाटील, हवालदार योगेश पाटील, हवालदार विरेंद्र शिंदे, हवालदार दीपक शिरसाठ, पोना भगवान पाटील, पो.कॉ. अमोल ठाकुर, पो. कॉ. राहुलकुमार पांचाळ, पो.कॉ. प्रणय पवार, पो.कॉ. भगवान मोरे तसेच नेत्रम येथील पो.कॉ. पंकज खडसे, पो.कॉ. मुबारक देशमुख यांच्या पथकाने ही प्रशंसनीय कामगिरी केली. याबद्दल पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक नखाते तसेच उपअधिक्षक गावीत यांनी शहर पोलिसांच्या प्रभारी अधिकारीसह पथकांचे कौतुक केले.