---Advertisement---
जिल्ह्यात जुलैच्या सुरुवातीला गोवंशीय पशुधनावर तीन तालुक्यात नंतर १३ व सद्यस्थितीत संपूर्ण जिल्हा लम्पीच्या विळख्यात आला आहे. यात लम्पी संसर्गबाधेमुळे आतापर्यंत ४० गोवशांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात ९६ संसर्ग बाधीत केंद्र
जळगाव जिल्ह्यात जुलैच्या सुरूवातीला तीन तालुक्यात लम्पी साथरोगाची लागण होऊन ३४ पशुधन बाधीत तर १ पशुधनाचा मृत्यू झाला होता. जुलै अखेर लम्पीचे संक्रमण १३ तालुक्यात होऊन ५५० पशुधन बाधीत तर १६ पशुधन दगावले असल्याचे समोर आले होते. सद्यस्थितीत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात लम्पीचा संसर्गाचे ९६ केंद्र आढळून आले आहेत.
४० पशुधनाचा मृत्यू
जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ६५ पशुधन बाधीत झाले आहे. यात ४६७ पशुधनावर उपचार सुरू असून उपचारांअंती ५५८ गोवंशीय पशुधन बरे झाले आहे. तर ४० पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुसंवर्धन विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांसह ५ शीघ्र कृती दल अधिकारी वर्गाकडून बाधीतपशुधनावर उपचार केले जात आहेत. यात उपचाराअंती बरे होण्याचे प्रमाण ५२ टक्के असून उपचारांसंदर्भात पाठपुरावा घेतला जात असल्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदिप झोड यांनी म्हटले आहे.
९७ टक्के पशुधनाचे लसीकरण
४ लाख ९६ हजार पशुधनापैकी ४ लाख ८४ हजार ८८५ सरासरी ९७टक्के गोवंशाचे लसीकरण करण्यात आले असून पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण आणि सेवा, सुश्रूषा, उपचार केले जात असल्याची माहिती पशुसंवर्धन प्रशासनाने दिली.
बाह्य परोपजीवी निर्मूलनासाठी घरगुती उपाय
गोचीड, गोमाश्या इत्यादी बाह्य परोपजीवींच्या नियंत्रणासाठी १० मि.लि. करंज तेल, १० मि.लि. कडुनिंब तेल + १० मि.लि. निलगिरी तेल, २० ग्रॅम अंगाच्या साबणाचा किस, १ लिटर स्वच्छ पाणी हे मिश्रण एकत्र करून गोवंशीय पशुधनाच्या अंगावर लावल्यास गोचीड
गोमाश्यांपासून संरक्षण मिळते. हा उपाय सुरक्षित, किफायतशीर व प्रभावी आहे.
बाधीत क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण
पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार संसर्ग बाधित केंद्राच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरणाच्या सूचना देण्यात आल्या असून गोवंशीय पशुधनास गोट पॉक्स या लम्पी प्रतिबंधात्मक लसीव्दारे लसीकरण करण्यात येत आहे.
पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार
गेल्या २०२२-२३ मध्ये रावेर तालुक्यात व नंतर बऱ्याच तालुक्यात तर गतवर्षी २०२४ दरम्यान चाळीसगाव तालुक्यात लम्पीचा संसर्ग सर्वाधिक आढळून मृत्यूचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर होते. यासंदर्भात लंपी चर्मरोग आजार विषाणूजन्य असून बाधित पशुधनावर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत. निरोगी पशुधनाचे बाधीत पशुधनापासून विलगीकरण करावे. आजारी पशुधनाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी समतोल पौष्टिक आहार द्यावा. हिरवी वैरण, पेंड, खनिज मिश्रणे, हर्बल लिव्हर टॉनिक, पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी प्री आणि प्रो-जैविक औषधांचा समावेश करावा. मान आणि फऱ्यावर सूज असल्यामुळे जे पशुधन वैरण खात नाहीत, त्यांना हाताने वैरण खाऊ घालावे. उंचीवर वैरण (हिरवा चारा) द्यावा. असे आवाहन पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी केले आहे.
गोवंशासाठी आठवडे बाजारावर निर्बंध
बाधित पशुधनाच्या संपर्कातील वैरण, गवत, साहित्य, कातडी आदी नियंत्रित क्षेत्रातून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वच तालुकास्तरावर कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत गुरांचे आठवडे बाजार उपबाजार आहेत. त्या ठिकाणी म्हैस, बकरी, मेंढी आदी प्राण्यांव्यतिरिक्त गोवंशीय पशुधन बाजारात ने-आण, खरेदी-विक्री करणेवर बंदी करण्यात आली आहे. तसेच गोवर्गीय पशुधनाच्या शर्यती, जत्रा, प्रदर्शन भरवू नयेत असे आदेश पारित करण्यात आले आहेत.
संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित
जिल्हा पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. यासंदर्भात आढावा घेत संसर्ग खबरदारी म्हणून संपूर्ण जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित करण्यात असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढला आहे.