जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने उपायुक्त, पशुसंवर्धन विभागाला निर्देश दिले.
क्षणाचाही विलंब न करता जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीवरून वैद्यकीय पथकाला तत्काळ पाठवण्याच्या सूचना दिल्या. काही वेळातच पशुवैद्यकीय अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी जखमी कुत्र्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा पशुवैद्यकीय रुग्णालयात हलवले.
मुक्या जीवांचीही काळजी घेण्याचा स्तुत्य उपक्रम
माणसाने मुक्या जीवांचीही काळजी घ्यावी, या तत्त्वावर विश्वास ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयाने आणखी एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत तहानलेली पाखरे पाण्यासाठी तडफडू नयेत म्हणून कार्यालयाच्या परिसरात विविध ठिकाणी पाण्याच्या कुंड्या ठेवण्यात आल्या.
याच उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वतः उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या कक्षासमोरील कुंडीत पाणी टाकून केली. यासाठी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी पुढाकार घेतला…!!
संवेदनशील प्रशासनाची प्रेरणादायी उदाहरणे
जखमी कुत्र्याला तातडीची वैद्यकीय मदत मिळवून देण्यापासून ते उन्हाळ्यात पाखरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यापर्यंत, संवेदनशील प्रशासनामुळे फक्त माणसांचीच नव्हे, तर मुक्या जीवांचीही काळजी घेतली जाऊ शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरते.