लोकगीतांतून लोकशाहीचा जागर : जळगावच्या दोन कलावंतांनी मिळवला निवडणूक आयोगाचा सन्मान

पाचोरा : महाराष्ट्र शासनाच्या मुख्य निवडणूक आयोग मुंबईतर्फे सन 2022 मध्ये घेण्यात आलेल्या लोकशाहीतून लोकगीतांचा जागर या समूह गीतगायन स्पर्धेत खान्देशातील नगरदेवळा येथील लोकरंग फाउंडेशनचे अध्यक्ष शाहीर शिवाजीराव पाटील यांचा मराठी गीताचा दुसरा क्रमांक आला आहे, तर खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर विनोद ढगे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण समारंभ 25 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे.

राज्यभरात मतदारांमध्ये जी उदासीनता दिसून येते ती उदासीनता दूर व्हावी या उद्देशाने राज्य निवडणूक आयोगाने सन 2022 मध्ये लोक कलावंतांना लोकगीतातून ‘लोकशाहीचा जागर’ हा विषय दिलेला होता. यामध्ये अनेक प्रवेशिका राज्यभरातून निवडणूक आयोगाला प्राप्त झाल्या. त्यात प्रथम क्रमांक जालना येथील शाहीर नानाभाऊ परिहार यांना प्रथम क्रमांकाचे रुपये 21 हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांना जाहीर झाले असून, 11 हजार रुपये, शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह तसेच तृतीय क्रमांकाचे समूह गटातील तिसरे बक्षीस जळगाव येथील शाहीर विनोद ढगे यांना पाच हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निवडणूक आयोगातर्फे हा कार्यक्रम 25 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे राज्य निवडणूक आयुक्त व मंत्री यांच्या उपस्थितीत चर्चगेट जवळ असलेल्या नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय निवडणूक दिनानिमित्त सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचा सन्मान होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगातर्फे शाहीर शिवाजीराव पाटील यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे