जळगाव : जिल्ह्यात एकीकडे पाणी वाचविण्यासाठी प्रबोधन केले जाते. मात्र, शहरात अमृत योजनेंतर्गत देण्यात आलेल्या नळजोडण्या खुल्याच ठेवण्यात आल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी गणेश कॉलनीच्या मुख्य चौकात दिसून आला. त्याकडे महापालिका पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे.
वाघूर प्रकल्पातून जळगावकरांना दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो. उमाळे येथे जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. तेथून पाणी शुद्ध होऊन जळगावकरांना पाणीपुरवठा केला जातो. महिन्यातून दोन-तीन वेळा जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार घडतच असतात. त्यामुळे शहरात पाणीबाणी होत असल्याचे प्रकार घडतात. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार एक दिवस पाणीपुरठा पुढे ढकलला जातो.
अमृत योजनेंतर्गत आतापर्यंत 80 हजारांवर नळजोडण्यात देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नळांची दुरुस्ती केली जात आहे. नवीन नळजोडण्याही देण्यासह जुन्या जोडण्या काढल्या जात आहेत. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे नळदुरुस्ती करणारे कर्मचारी कमी असून, नागरिकांची नेहमी ओरड होत असते. अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसून, फुटलेल्या जलवाहिन्यांमुळेही शुद्ध केलेल्या पाण्याची नासाडी होत आहे.
रस्तेकामासाठी जलवाहिनीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यांतही जोडणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळेही हजारो लिटर शुद्ध पाणी गटारातून वाहून जात आहे.
शहरातील गणेश कॉलनीच्या मुख्य चौकातील गीताशंकर व्यापारी संकुलानजीक मंगळवारी (19 डिसेंबर) सायंकाळी अमृत योजनेच्या देण्यात आलेल्या विनातोट्यांच्या नळजोडण्यांतून हजारो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असल्याने संकुलातील व्यावसायिकांसह वाहनचालकांनी संताप व्यक्त केला. अमृत योजनेंतर्गत देण्यात आलेल्या नळजोडण्या खुल्याच ठेवण्यात आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी पाणी सोडल्यानंतर त्यातून हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत होते. व्यावसायिकांकडून महापालिका प्रशासनावर याबद्दल संताप व्यक्त केला जात असून, नळजोडण्यांना तोट्या लावण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाने यावर मार्ग न काढल्यास भविष्यात जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशीही चर्चा होती.