जळगाव । चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्याच्या घटना सातत्याने घडत असून अशीच एक घटना जळगावातून समोर आलीय. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत पुतणीचा पती व त्याच्या भावाने पिंप्राळा येथील व्यापाऱ्याची ४८ लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पैसे मागितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी (११ नोव्हेंबर) रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
गोपाल प्रभुलाल राठी (६३, रा. पिंप्राळा) यांची एमआयडीसीमध्ये कंपनी होती. त्यांनी ती सन २०१८-१९ मध्ये विकली होती. त्यासाठी त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते. गोपाल राठी यांच्याकडे पैसे असल्याची माहिती पुतणीचे पती विजय जगदीश मंडोरे आणि त्यांचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्याकडे होती. मंडोरे यांनी सन २०१६ मध्ये सव्वा दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते. ते त्यांनी सहा महिन्यांनी परत केले. त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा घर घेण्यासाठी त्यांनी २ लाख रुपये गोपाल राठी यांच्याकडून घेतले. परंतु ते परत दिले नाहीत.
नंतर पुतणी वर्षा मंडोरे आणि जावई विजय मंडोरे यांनी राठी यांना सांगितले की, तुम्ही आम्हाला पैसे दिले तर त्याच्या ५ ते ६ पट रक्कम परत देऊ. यावर गोपाल राठी यांचा विश्वास बसला नाही. जास्त दबाव टाकल्याने त्यांनी थोडा वेळ मागून घेतला. विश्वास ठेवून राठी यांनी वेळोवेळी त्यांना ऑनलाईन, आरटीजीएस आणि चेक स्वरूपात तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपये दिले
त्यानंतर राठी यांनी डिसेंबर २०२३ पासून परतावा मागितला असता हुसकावून लावले आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुमचे पैसे बुडाले असे घुडकावून लावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राठी यांनी ११ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन विजय मंडोरे आणि त्याचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.