---Advertisement---

Jalgaon News : मध्यरात्री टोळक्याची हॉटेलात हैदोस; पोलिसांनी घेतली धाव, पण…

---Advertisement---

जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये टोळक्याने हैदोस घालीत तोडफोड केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन गेले. ही घटना उघडकीस आत्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती.

शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या हॉटेल शुगर अॅण्ड स्पाईसी या हॉटेलमध्ये काही तरुण जेवणासाठी आले होते. हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर त्या टोळक्याने हॉटेलमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करीत टोळक्याने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी हॉटेलच्या मालकासह कामगारांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनादेखील शिवीगाळ करण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत धुडगूस घालणारे टोळके तेथून पसार झाले होते. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर टोळक्याने हॉटेलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआरची तोडफोड केली. तो सोबत घेऊन गेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल कण्यात आलेला नव्हता.

कापसाच्या दोन व्यापाऱ्यांना तब्बल सव्वा कोटीत गंडविले

जळगाव : शहरातील दोन कापूस व्यापाऱ्यांची तब्बल १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उत्तराखंडमधील एका वस्त्रोद्योग कंपनीच्या संचालकांसह तिघांविरुद्ध एम आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रवींद्र नगर भागातील रहिवासी वल्लभसुभाषचंद्र अग्रवाल (वय ५१) आणि म्हसावद येथील ओम जिनिंग अँड प्रेसिंगचे मालक अशोक रामकरण पोरवाल यांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी रविवारी अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बी.एस.टी. टेक्स्टाइल मिल्स प्रा. लि. (उत्तराखंड) चे संचालक मुकेश बलराजसिंग त्यागी, त्यांची पत्नी संगीता मुकेश त्यागी आणि मुलगा निखिल मुकेश त्यागी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अग्रवाल यांच्या मित्राचीही ३८ लाखांत फसवणूक

वल्लभ अग्रवाल यांनी एमआयडीसी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार अग्रवाल यांची उमाळे येथे चिरायू कॉटन इंडस्ट्रीज नावाची जिनिंग फॅक्टरी आहे. ते दलालांमार्फत कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. तीन वर्षांपूर्वी ‘इंडियन कमोडिटीज डॉट कॉम’चे संचालक दिनेश हेगडे यांच्यामार्फत त्यांची ओळख बी.एस.टी. टेक्स्टाइल मिल्सचे संचालक मुकेश त्यागी यांच्याशी झाली. यानंतर सप्टेंबर २०२४ मध्ये अग्रवाल यांनी सुमारे ९६ लाख ९८ हजार २८४ रुपयांचा कापूस त्यागी यांच्या कंपनीला पाठविला. मात्र, मुदत उलटूनही पैसे न मिळाल्याने अग्रवाल यांनी विचारणा केली असता, टाळाटाळ करण्यात आली.

अग्रवाल यांनी ही माहिती त्यांचे मित्र अशोक पोरवाल यांना दिली असता, पोरवाल यांनीही याच कंपनीला १८ जून २०२४ रोजी ३८ लाख ७८ हजार रुपयांचा कापूस पाठवला होता, अशी माहिती समजली. त्यांचीही रक्कम अद्याप मिळाली नसल्याची माहिती कळली. अग्रवाल यांची ९६ लाख ९८ हजार व पोरवाल यांची ३८ लाख ७८ हजार, अशी सुमारे एक कोटी ३५ लाख ७६ हजार ९०४ रुपयांच्या फसवणूकप्रकरणी एम आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक मोहन पाटील तपास करीत आहेत

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment