जळगावातील उद्यानांच्या बिकट अवस्थेकडे  प्रशासन कधी देणार लक्ष?

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव  : शहरात फिरण्यासाठी वा लहान मुलांना खेळण्यासाठी मनपा प्रशासनांतर्गत काही उद्याने विकसित करण्यात आली आहेत. परंतु या उद्यानात खेळण्यांसह आजूबाजूची स्थिती पहाता या उद्यानात मुलांना खेळण्यासाठी आणावे किंवा नाही, अशी परिस्थिती येथे आहे.

शहरात महानगरपालिकास्तरावर चार पाच उद्याने आहेत. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मेहरूण तलावानजीक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, म.गांधी उद्यान, महामार्गालगतचे बहिणाबाई उद्यान आणि काव्यरत्नावली परिसरातील भाऊंचे उद्यान आहे. यातील म.गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान आणि बहिणाबाई उद्यान वगळता अन्य परिसरातील उद्यानांची अवस्था बिकट आहे. भाऊंचे उद्यान व गांधी उद्यानाचा जैन उद्योग समुहाने कायापालट केला.

शामाप्रसाद मुखर्जी उद्यान- शहर मनपापासून काही अंतरावर आणि जिल्हा परिषदेसमोरच डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान आहे. या उद्यानातील खेळण्यांची मोडतोड झाली असून, उद्यान प्रेमियुगुलांचा व दुपारच्या वेळी हाताला कामे नसलेल्यांचा अड्डा बनले आहे. लहान मुलांना उद्यानात खेळण्यासाठी आणावे की नाही, अशी संभ्रमावस्था परिसरातील रहिवाशांची झालेली आहे.
वृंदावननगर उद्यानातील घसरगुंडी, सीसॉ तुटलेल्या अवस्थेत असून, परिसरातील नागरिकांनी याबाबत महापालिका प्रशासनास कळवूनही खेळणी दुरुस्त करण्यासाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मेहरूण तलावापासून काही अंतरावर असलेले शिवाजी उद्यान एकेकाळी शहरवासीयांना भुरळ घालून होते. या परिसरात शालेय सहलींसह लहान मुलांसाठी जलतरण तलाव देखील होता. याचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेता, निर्माता स्व.राजकपूर यांच्या हस्ते करण्यात आले होते असा उल्लेख आहे. परंतु या उद्यानांत सद्यस्थितीत म्हशींचा तबेला असून अनेक अनैतीक उद्योग दिवसाढवळ्या होत असल्याने सर्वसामान्य नागरिक या परिसरात जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. या व्यतिरिक्त रात्रीच्या सुमारास उद्यानावर देखील गर्दूले मद्यपिंचा ताबा असतो. शहरातील अन्य काही लहान,लहान उद्यानांची हीच स्थिती असताना मनपा प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्षच होत असल्याचे लक्षात येते.