जळगाव, दि. १३ फेब्रुवारी | गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक पातळी गाठली आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. तसेच, चांदीच्या किमतीतही विक्रमी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांची खरेदी करण्याची क्षमता कमी झाली आहे.
बुधवारी सोन्याच्या दरात ६०० रुपयांची घसरण
जळगाव सराफ बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर विनाजीएसटी ८५,५०० रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर जीएसटीसह हा दर ८८,०६५ रुपये इतका होता. दुसरीकडे, चांदीचा दर स्थिर राहिला असून एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९७,००० रुपये आहे.
हेही वाचा : सुनेच्या प्रियकराला सासूने बोलावलं भेटायला; मग पुढे जे घडलं त्याचा त्याने स्वप्नातही केला नसेल ‘विचार’
सध्या सोन्या-चांदीच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लग्नसराई सुरू असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात असताना वाढत्या दरांमुळे ग्राहकांना खरेदी करताना मोठा खर्च करावा लागत आहे. सोन्या-चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असून सराफा व्यावसायिकांनी यंदा सोन्याचा दर ९०,००० रुपयांपर्यंत तर चांदीचा दर १,००,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
गुंतवणूकदार आणि ग्राहकांची चिंता वाढली
सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साह असला तरी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. लग्नसराईत सराफा बाजारातील मंदी दूर होईल अशी अपेक्षा होती, मात्र वाढत्या दरांमुळे ग्राहक मागे हटताना दिसत आहेत.
सराफा व्यावसायिकांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या दरातील चढ-उतार याचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर होत आहे. आगामी काळातही दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने ग्राहकांनी योग्य वेळी खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.