जळगाव : आठवडाभरावर लग्न आल्याने घरात तयारी व आनंदाचे वातावरण असताना २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवारी (१३ मे) सकाळी उघडकीस आली आहे. उपवर अमोल वाल्मीक पाटील (२१, रा. वाकडी, ता. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वाकडी येथे आई-वडील, दोन भावांसह राहणारे अमोल पाटील हे वडिलांना शेतीकामात मदत करत होते. अमोल यांचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले. २० मे रोजी हळद व २१ मे रोजी लग्न असल्याने घरात तशी तयारीदेखील सुरू होती.
मात्र सोमवारी (१२ मे) रात्री जेवण झाल्यानंतर ते शेतात गेले. नंतर ते घरी परतलेच नाहीत. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हे शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. लग्न अवघ्या काही दिवसांवर असताना होणाऱ्या नवरदेवाने टोकाचं पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
संघटितपणे घरफोडी करणारे दोघे ताब्यात
जळगाव : संघटित गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या रितेश संतोष आसेरी (४६, रा. रणछोडदास नगर) व रणजीतसिंग जीवनसिंग जुन्नी (३२) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा एक लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोहेकों गणेश शिरसाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, पोकाँ राहुल घेटे, नितीन ठाकूर, किरण पाटील, राकेश बच्छाव यांनी दोघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजयसिंग पाटील, रवी नरवाडे, अक्रम शेख यांनी कारवाईत मदत केली.