जळगाव : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा 2 अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 34,423 घरकुलांचे भूमिपूजन एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर करण्यात आले.
जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 24-25 साठी 86,689 घरकुले मंजूर करण्यात आली होती. त्यात 71,645 लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले होते.
त्यानुसार 4 मार्च रोजी विशेष मोहीमेंतर्गत 35,264 घरकुलांची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती. तसेच गत सप्ताहात विशेष अभियानाअंतर्गत 34,423 घरकुलांचे भूमिपूजन करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 70,687 घरकुलांचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे.
यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटविकास अधिकाऱ्यांना नियमित पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या वेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, रोजगार सेवक, ग्रामीण गृहनिर्माण अभियंते आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.