---Advertisement---

Jalgaon News : सावधान! उष्माघाताने तिघांचा मृत्यू ? अत्यवस्थ दोघे दगावले

---Advertisement---

जळगाव : गेल्या चार दिवसांपासून सूर्य आग ओकतोय. चटकेदार उन्हाच्या गरम वायुलहरी शरीराची लाहीलाही करत आहेत. तळपत्या सूर्याच्या दाहकतेने शहरवासीय हैराण झाले आहेत. एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. अन्य दोघांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कलिंदर अकबर तडवी (वय ५७. रा. खापोली, जि. रायगड, ह.मु. मकरा टॉवर अपार्टमेंट, जळगाव) यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाइकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी (८ एप्रिल) दाखल केले. दरम्यान तपासणीअंती त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजून आले नाही. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार प्रकाश पाटील हे तपास करीत आहेत.

एमआयडीसीतील काशिनाथ चौकात अॅक्सीस बँकेसमोर अंदाजे ५० वर्षीय अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत आढळून आला. हा प्रकार लक्षात येताच प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार अनोळखीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती डॉक्टरांनी अनोळखीला मृत घोषित केले. उष्म्याने अनोळखीचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटील हे तपास करीत आहेत.

उपचाराला प्रतिसाद नाही

सुभाष पुना सपकाळे (वय ६५, रा. गेंदालाल मिल, जळगाव) यांची प्रकृती अचानक अत्यवस्थ झाली. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना त्यांची प्रकृती खालावली. त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद न मिळू शकल्याने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार वीरेंद्र शिंदे हे तपास करीत आहेत.

विजेच्या तारेला स्पर्श होऊन मृत्यू

वीज महावितरण कंपनीच्या विजेच्या खांब्यावरील तुटलेल्या तारेला स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यात २० ते २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. चौघुले प्लॉट परिसरात रेल्वे लाइनच्या जवळ कच्च्या रस्त्यावर ही घटना घडली. बेशुद्धावस्थेतील या अनोळखीला तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासणीत मृत घोषित केले. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार प्रमोद पाटील हे तपास करीत आहेत.

शेतकरी मृतावस्थेत

भास्कर निंबा पाटील (वय ६५, रा. धारागीर, ता. एरंडोल) हे गृहस्थ रिद्धी टी सेंटरच्या १०० मीटर अंतरावर मलकापूर ते मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ५३ च्या बाजूला नाल्यात बेशुद्धावस्थेत आढळून आले. स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलविले असता तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

भरउन्हात बाहेर जाणे टाळा

वाढते तापमान शरीराला तापदायक आहे. उन्हापासून बचाव करणे, हे आरोग्याला सुरक्षित ठेवू शकेल. कामासाठी घराबाहेर पडताना पाण्याची बाटली, डोक्याला रुमाल आणि पांढरे कपडे परिधान करून बाहेर पडावे. उन्हामध्ये पायी फिरण्याचे टाळायला हवे. उन्हाची तीव्र झळ बसल्यास तोंडाला कोरड, डोकेदुखी, अशक्तपणा असा त्रास होऊ शकतो. अशी लक्षणं आढळल्यास तत्काळ डॉक्टरकडे जावे, असे आवाहन डॉ. किरण पाटील शल्य चिकित्सक, शासकीय रुग्णालय, जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment