Jalgaon Municipal Corporation : रायसोनी नगर, देवेंद्र नगर परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या 100 फुटी रस्त्याच्या दोन्ही बाजुला करण्यात आलेले पत्र्यांच्या दुकानांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शुक्रवार, 23 रोजी काढले. दरम्यान दोन दुकानचालकांना कागदपत्रे देण्याचे सांगण्यात आले आहे.
100 फुटी रस्त्यावर वेगाने होत असलेल्या या अतिक्रमणाबाबत महापालिकेत नागरीकांच्या तक्रारी आल्या होत्या. परंतु त्याची दखल घेण्यात येत नव्हती. यामुळे या अतिक्रमणांच्या संख्येत वाढ झाली होती. वाढत्या अतिक्रमणाबाबत माध्यमांमधून वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या अतिक्रमणांवर टाच आणली. रस्त्यावरील 20 अतिक्रमित टपऱ्या उचलून त्या जप्त करण्यात आल्यात.
ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या उपायुक्त निर्मला गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे,अतिक्रमण विभाग प्रमुख अतुल पाटील जय ठाकूर, संजय पाटील, साजिद अली, सतीश ठाकरे या कर्मचाऱ्यांनी केली.
दोन दुकानचालकांकडून मागवली कागदपत्रे
विकास दुधाची टपरीसह एका दुकानचालकास जागेबाबत परवानगीची कागदपत्रे मागवण्यात आली आहेत. ती सोमवार पर्यंत न मिळाल्यास सोमवारी त्यांचेही अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याच भागातील रायसोनी नगरातील जिजाऊ चौकात शासनाने दिलेले पत्र्याचे गटई स्टॉलही अतिक्रमण निर्मूलन पथकाने उचलून घेतले. याबाबत स्टॉलधारक भाईदास हिरामण गवळे यांनी विरोध केला असता पथकाने स्टॉल उचलून नेला. शासनाने गटई स्टॉल दिले आहेत. ते उचलण्याचे अधिकार महापालिकेला नाही असा दावा स्टॉलधारक भाईदास हिरामण गवळे यांनी केला आहे.