jalgaon Municipal Corporation : बदल्यांच्या गोंधळात माहिती अधिकाराच्या सुनावणीस महापालिकेला अपिलीय अधिकारीच मिळेना

jalgaon Municipal Corporation :     अधिकाऱ्यांच्या बदल्याच्या गोंधळात माहिती अधिकारातील सुनावणीसाठी अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही. ज्यांची नियुक्ती केली होती त्या अधिकाऱ्यांकडील पदभार काढत त्यांना दुसरी जबाबदारी दिली. त्यामुळे माहिती अधिकारातील प्रथम सुनावणी कोणी घ्यावी याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. याबाबत अतिरीक्त आयुक्तांसह उपायुक्त, सहआयुक्तांनीही आम्हाला प्राधिकृत न केल्याने आम्ही सुनावणी घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे असलेला आस्थापना विभागाचा पदभार हा अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर काम पाहत आहेत. त्यामुळे अभिजीत बाविस्कर यांनी सुनावणी घ्यावी की, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी घ्यावी, किंवा तत्कालिन सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी ही सुनावणी घ्यावी याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

 

उपायुक्त अविनाश गांगोडे यांच्याकडे सध्या आस्थापना विभागाचा पदभार नसल्यामुळे त्यांनी संबधित अपिलावर सुनावणी घेण्यास नकार दिला असून अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत व सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांना देखील आयुक्तांनी प्राधिकृत केले नसल्यामुळे त्यांनी देखील सुनावणी घेण्यास नकार दिला.

 

आयुक्त डॉ. गायकवाड यांच्याकडून वारंवार अधिकाऱ्यांच्या होणाऱ्या बदल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला असून यामुळे अपिलकर्त्यांचा वेळ वाया गेला असून त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला.

 

सामान्य प्रशासन, आस्थापना विभाग माझ्याकडे देण्यात आला आहे. परंतु अपिलीय अधिकारी म्हणून पदनिर्देशित करण्यात आलेले नाही. त्यामुळे मी सुनावणी घेवू शकत नाही. दोन दिवसात आयुक्तांनी पदनिर्देशित केल्यावर संबधित अपिलकर्त्यांची सुनावणी घेता येईल.

पल्लवी भागवत, अतिरिक्त आयुक्त, मनपा जळगाव

 

प्राधिकृत अधिकारीच घेतील सुनावणी

सामान्य प्रशासन, आस्थापना विभागाचा पदभार आपल्याकडे नाही. त्यामुळे मला संबधित अपिलकर्त्यांची सुनावणी घेता येणार नाही. आयुक्त ज्या अधिकाऱ्यांना प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून प्राधिकृत करतील तेच अधिकारी सदरच्या अपिलवर सुनावणी घेवू शकतील.

अविनाश गांगोडे, उपायुक्त, मनपा जळगाव