Jalgaon Municipal Corporation budget : महापालिकेचे सन 2024-25 चे वार्षिक 981 कोटी 47 लाख 29 हजार रूपयाचे अंदाजपत्रक मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे सादर केले आहे. पुढील आठवड्यात महासभेत आयुक्त दुरूस्तीसह सादर करतील.
कोणतीही करवाढ नसल्याने जळगावकरांना हा दिलासा आहे. महापालिकेत लोकनियुक्त पदाधिकारी नसल्याने प्रशासनातर्फे सन 2024-25 चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे. बुधवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी ते आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्याकडे सूपूर्द केले. आयुक्तांनी स्थायी समिती सभेत त्यांची माहिती दिली. 981 कोटी 47 लाख 29 हजार रूपयाचे हे अंदाजपत्रक आहे. त्यात सध्यास्थितीत कोणतीही करवाढ सूचविण्यात आलेली नाही.
मालमत्ता करातून 69 कोटी 28 लाख उत्पन्न
महापालिकेतर्फे उत्पन्नाचा मूळ स्त्रोत मालमत्ता कर असून या करातून तब्बल 69 कोटी 28 लाख रूपये उत्पन्न अपेक्षीत धरण्यात आले आहे.
यात घरपट्टीसह इतर मिळकत करातून 64 कोटी 56 लाख तर खुला भुखंडातून 4 कोटी 71 लाख 34हजार उत्पन्न अपेक्षीत धरण्यात आले आहे. यात शासकीय तसेच पाणी पुरवठा कर वेगळे आहेत. महापालिकेच्या मिळकतीपासून 90 कोटी 50 लाखाचे उत्पन्न अपेक्षीत आहेत.यात महापालिकेचे व्यापारी संकुलातील गाळेही आहेत. शासन अनुदानीत योजनेतून 301 कोटी 42 लाख रूपये उत्पन्न अपेक्षीत आहे.
नवीन रस्त्यासाठी 15 कोटी 50 लाख
शहारातील विविध कामासाठी खर्च बाजूत नियोजन करण्यात आले आहे. यात शहरातील नवीन रस्त्यासाठी 15 कोटी 50 लाखाचे नियोजन करण्यात आले आहे.नवीन गटारीसाठी 6 कोटी 15लाख, नवीन संडास मुत्रीसाठी 60 लाख,नवीन पुतळ्यासाठी दोन कोटी, नवीन वाहन खरेदीसाठी दोन कोटी,नवीन बोगदा,उड्डानपूलासाठी 50 लाख
दीक्षाभूमी भूमीसंपादनासाठी दहा कोटी
महापालिकेतर्फे शहरात दीक्षा भूमी उभारण्यात येणार आहे. महासभेत त्यांची ग्वाही तत्कालीन महापौर जयश्री महाजन यांनी दिली होती. त्या दीक्षाभूमीच्या भूमीसंपादनासाठी दहा कोटीची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय इतर खर्चाचचेही नियोजन करण्यात आले आहे.
पुढील आठवड्यात अंतीम अंदाजपत्रक
महापालिकेचे अदांजपत्रक मुख्यलेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे यांनी स्थायी समितीत आयुक्ताकडे सादर केले आहे. आयुक्त डॉ.विद्या गायकवाड काही दुरूस्तीसह अंतीम अंदाजपत्रक पुढील आठवड्यात महासभेत सादर करतील.