Jalgaon Municipal Corporation : शहरातील प्रभाग समिती क्रमांक 2 व प्रभाग समिती क्रमांक 1 अंतर्गंत एका खासगी सेवाभावी संस्थेला मनपाने करार करून दिलेल्या जागांना मालमत्ता करांची आकारणी करावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली आहे. यासंदर्भांत त्यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना निवेदन दिले आहे.
शहरातील प्रभाग समिती क्रमांक 2 अंतर्गंत पांझरापोळ परिसरातील मनपाच्या मालकीची शाळा क्रमांक 3 ची इमारत व क्रीडांगण मधील (सीटीएस नं.2656/2) जागा एका खासगी सेवाभावी संस्थेला देण्याबाबत ठराव क्र.555 दि.3 डिसेंबर 2016 रोजी करण्यात आला असून सदर संस्थेला एकुण 438.00चौ.मी. बांधकाम व 1 हजार चौ.मी. जागा 30 वर्ष भाडे कराराने देण्यात आली आहे.
सदर जागेचा वाणिज्य वापर होत असून देखील मनपाने त्या जागेला कर आकारणी केलेली नाही, त्याच प्रमाणे मनपा मालकीचे छत्रपती शाहू महाराज रूग्णालयाच्या जागेपैकी पहिला मजल्याची 1472.42 चौ.मी. व दुसरा मजला 1486.36 चौ.मी. जागा अशी एकुण बांधकाम क्षेत्रफळ 2958.78 चौ.मी.जागा त्याच खासगी सेवाभावी संस्थेला देण्यात आली आहे. या जागेचा देखील वाणिज्य वापर होत आहे. तरी, महापालिकेने या दोन्ही जागांना मालमत्ता कर आकारलेला नसल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. म्हणून सदर मालमत्तांना कराची आकारणी करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी निवेदनाव्दारे केली आहे.