Jalgaon Municipal Corporation: गेल्या 25 वर्षानंतर शहरातील प्रमुख रस्ते डांबरी व काँक्रिटची तयार होत आहे. या रस्त्यांच्या सफाईसाठी महापालिकेने यांत्रिक झाडू अर्थात रोड स्वीपिंग मशिन खरेदी केले आहे. सदर मशिन प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीस प्राप्त होणार आहे. या यांत्रिक झाडूने प्रमुख रस्त्याची सफाई करण्यात येणार आहे.
शुध्द हवा उपक्रमाअंतर्गंत प्राप्त निधीतून महापालिका प्रशासनाने शहरातील रस्त्यांना झाडून मारण्यासाठी 1 कोटी 16 लाख रुपयांची रोड स्वीपिंग मशिन खरेदी केली आहे. या मशिनच्या सहाय्याने शहरातील प्रमुख रस्त्यांना झाडू मारला जाणार असून रस्त्यावरील धुळ माती व्हॅक्यूमच्या सहाय्याने ओढून एका ठिकाणी जमा केली जाणार आहे. यामुळे आता रस्त्यांच्या सफाईसाठी वेगळे मनुष्यबळ लावण्याची गरज भासणार नाही.
घनकचऱ्याच्या विलगीकरणासाठी नव्या एजन्सीचा शोध
शहरासाठी घनकचरा प्रकल्पाचे काम पुर्ण होईपर्यंत कचऱ्याचे विलगिकरण करण्यासाठी तात्पुरती एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. महापालिकेने शहरातील अस्वच्छता वाढीची कारणेही शोधली आहेत. धुळ, तसेच कचऱ्यावर प्रक्रिया न होणे आणि जुने सार्वजनिक शौचालय नष्ट न करणे ही महत्त्वाची तीन कारणे असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिकेने आता त्या दृष्टीने उपाय योजना करण्याचा निर्णय घेतला आहे.मलनिस्सारण प्रकल्प होणार कार्यान्वीत
शिवाजी नगरात उभारलेल्या मलनिस्सारण प्रकल्पाची वीज जोडणीचे काम सुरु आहे. हे काम देखील लवकरच पुर्ण होणार असल्याने फेब्रुवारी महिन्यात हा प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. मलनिस्सारण प्रकल्प सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात झालेल्या मलनिस्सारण लाईनद्वारे मैला प्रकल्पापर्यंत वाहून नेला जाणार असून तेथे त्या मैलावर प्रक्रिया केली जाणार आहे.रँक वाढविण्यासाठी प्रयत्न
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या कचरा मुक्त अभियानात जळगाव शहराचा क्रमांक 84 हून तो थेट 167 पर्यत घसरला आहे. शहराला वरच्या क्रमांकात आणण्याचे प्रयत्न आरोग्य विभागाने सुरु केले आहे. तसेच शहरातील अनेक भागांमध्ये आता नव्याने रस्ते होत असल्याने रस्त्यांची कामे पुर्ण झाल्यानंतर मोठ मोठ्या रस्त्यांवर रोड स्वीपिंग मशिनच्या सहाय्याने हे रस्ते स्वच्छ केले जाणार आहेत. येत्या 15 दिवसात हे मशिन शहरातील प्रमुख रस्त्यांवर दिसणार आहे.