मनपाच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांची बदली

जळगाव :  जळगाव शहर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांची नवी मुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचानालयात उपायुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे. तर सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक आयुक्त या पदावर बदली झाली आहे.

या दोघांच्या बदलीचे आदेश शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी अवर सचिव अ.का लक्कस यांनी काढले आहेत. शुक्रवारी काढलेल्या या आदेशात अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत व सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांना शुक्रवारीच जळगाव महापालिकेतून कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या दोघा अधिकाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी ९ सप्टेंबर रोजी हजर होण्याचे आदेशही यात देण्यात आले आहेत.

सहायक आयुक्त बाविस्कर धुळ्याला
सहायक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांची जळगाव महापालिकेत २६ एप्रिल २०२२ रोजी नियुक्ती झाली होती. महापालिकेत त्यांना २ वर्ष पूर्ण झाली होती. परंतु आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर त्यांची बदली करण्यात आली. अभिजीत बाविस्कर हे मूळचे जळगावचे असल्याचे त्यांचा महापालिकेतील ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आतच त्यांची धुळ्याला बदली करण्यात आली.

नविन नियुक्ती नाही
अतिरीक्त आयुक्त व सहायक आयुक्तांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर अद्याप कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शनिवार व रविवार असे दोन दिवस सुटी असल्याने या दोन्ही रिक्त पदांवर सोमवार, ९ सप्टेंबर रोजी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

नियुक्तीपासूनच बदलीसाठी प्रयत्न
अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत या जळगाव महापालिकेत १८ ऑगस्ट २०२३ रोजी रूजू झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांचे जळगावहून दुसरीकडे बदलीसाठी प्रयत्न होते. १६ जुलै २०२४ रोजी त्यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. तत्कालीन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची लोकसभा निवडणूक काळात नवी मुंबई येथे नगरपरिषद प्रशासन संचानालयात उपायुक्त या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्या या पदावर रूजू न होता मॅटमध्ये गेल्या होत्या. तेव्हापासून हे पद रिक्त होते. त्यामुळे या रिक्तपदावर अतिरीक्त आयुक्त पल्लवी भागवत यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांनी शुक्रवार ६ सप्टेंबर रोजी बदली करण्यात आली.