Jalgaon News : अजित पवारांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा जल्लोष

जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रसेचे नेते अजित पवार यांनी रविवारी भाजपसोबत जाऊन मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे जळगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला.

अजित पवार समर्थकांनी व काही पदाधिकार्‍यांनी या निर्णयाचे स्वागत केले. कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाबाहेर आतिषबाजी करित रविवारी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, विनोद देशमुख, वाय. एस. महाजन, युवक महानगर कार्याध्यक्ष सुशील शिंदे, अतुल चव्हाण, सेवादल महानगराध्यक्ष माहेश्वरी, युगल जैन आदी उपस्थित होते. यावेळी एकच वादा अजित दादा, अजित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले की, अजित पवार यांची महाराष्ट्राला गरज होती. विकासाचे व्हीजन असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राला हवाहवासा असा नेता आहे. आम्ही संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सहकारी, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत आहोत. अजित पवार यांचे मनापासून अभिनंदन करतो. संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष अजित पवार, शरद पवार यांच्या सोबत आहोत.  राष्ट्रवादी पक्षात फूट पडलेली नाही. पवार साहेब आमचे सर्वांचे दैवत आहे. आम्ही सर्व अजित पवार यांच्यासोबत आहोत. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे.

विनोद देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, याला आमचे संपूर्ण समर्थन आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी अजित पवार यांच्यासारखा नेता प्रशासनामध्ये असावा याचे महत्व भाजपाला पटले आहे. त्यादृष्टीने अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद आनंद असल्याचे त्यांनी म्हटले.