जळगाव : भरधाव अज्ञात वाहनाने उडवल्याने मांडवेदिगर येथील मूळ रहिवासी – व हल्ली कुसुंबास्थित प्रौढाचा मृत्यू झाला. हा अपघात जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवार, १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. करतार तोताराम पवार (४८, रा. मांडवे दिगर, ता. भुसावळ, ह.मु. कुसुंबा) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
कामावरून परतताना अपघात
करतार पवार हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात वास्तव्याला होते. ते एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. नेहमीप्रमाणे सोमवार, १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले. कुसुंबा गावाच्या काही अंतरावरून येत असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत करतार पवार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, दोन मुले संभाजी, ईश्वर आणि मुलगी भारती असा परिवार आहे.