jalgaon news: अभय शास्ती माफी योजनेचा रविवारपर्यत घेता येणार लाभ

जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षापासून थकबाकी न भरणाऱ्या  418 थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी शास्ती माफी योजनेस 31 डिसेंबरपर्यत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आता रविवारपर्यत पाचच दिवस उरले आहेत. त्यानंतर मात्र मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. थकबाकी न भरणाऱ्या 38 जणांचे नळसंयोजन आज बंद करण्यात आले आहे.

मनपा ने थकीत मालमत्ता करधारकांसाठी अभयशास्ती योजना 4 ते 19 डिसेंबर या कालावधीत घोषित केली होती. त्यानुसार सदर कालावधीत 12 कोटी रुपयाचा भरणा झाला होता. पूर्वनियोजनानुसार 22 डिसेंबरला उर्वरित थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार होता. परंतु थकबाकीदारांच्या विनंतीनुसार आयुक्तांनी मुदत वाढवून देत ती 31 डिसेंबरपर्यत केली आहे.

 38 जणांचे नळ संयोजन केले बंद

आज मंगळवारी प्रभाग 3 मधील 38 जणांचे नळ संयोजन बंद केली आहेत. तर 13 लाख 45 हजार रूपयांचा भरणा आज झालेला आहे.

शेवटचे पाचच दिवस शिल्लक

अभय शास्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ पाचच दिवस म्हणजे रविवार, 31 डिसेंबरपर्यतची मुदत आहे. रविवारही थकबाकीचा भरणा ऑनलाईन व ऑफलाईन अशा पध्दतीने स्वीकारण्यात येणार आहे.

…तर होऊ शकतो घरांचा लिलाव

31 डिसेंबरपर्यत अभय शास्ती योजनेचा लाभ न घेणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात लिलाव करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. हा लिलाव होऊ नये म्हणून नोटीस बजावलेल्या थकबाकीदारांनी कराचा भरणा करून शास्ती माफी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.