जळगाव: महापालिकेचा महसुल विभाग खऱ्या अर्थाने आता डिजीटल झालेला आहे. शनिवार, ४ मे पासून शहरातील सर्व करदात्यांना मालमत्ता कराचे ‘डिजीटल ई मालमत्ता बिल’ व्हॉटसअॅपच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे. यासोबतच मतदानाबाबत जागृती व्हावी यासाठी या डिजीटल बिलावर मतदान यंत्राचे चिन्हही दिले असून त्यावर क्लिक केल्यास सबंधितास त्याची व्होटर स्लिपही मिळणार आहे.
यामुळे मालमत्ता धारकांना आता घरबसल्या मालमत्ता करांचा भरणा करता येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक पल्लवी भागवत यांनी सायंकाळी महापालिकेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सध्याचे युग डिजीटलचे व स्मार्ट फोनचे आहे. त्यामुळे मालमत्ता बिल व त्यांचा भरणा करणे सोईचे व काही सेकदांत व्हावे यांसाठी मनपाने प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले आहे.
दीड लाख मालमत्ता धारकांना आज मिळेल ई बिल
शनिवार, ४ मे पासून पहिल्या टप्प्यात सुमारे दीड लाख मालमत्ता धारकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर सन् २०२४- २०२५ या वर्षाची मालमत्ता करांची बिले पीडीएफ स्वरूपात पाठवण्यात येणार आहे. या बिलावर खाली कोपऱ्यात ‘पे नाऊ’ असे ऑप्शन दिले आहे. त्यावर क्लिक करून करांचा भरणा ऑनलाईन भरता येईल.