जळगाव : वाढत्या प्रदुषणावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने ई वाहनांना प्रोत्साहन देत आहे. यासोबतच इंधनाच्या वाढत्या दरामुळेही अनेकजण ई वाहनांकडे वळत आहेत. अशा वाहनधारकांसाठी महापालिकेतर्फे शहरात तूर्तास दोन ठिकाणी चार्जीग स्टेशन सुरू करण्यात येत आहेत. याबाबतचे कार्यादेश देण्यात आले असल्याची माहीती आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली.
शहरात दुचाकी, रिक्ष्ाा व कार अशा ई वाहनांची संख्या वाढत आहे. मात्र त्यांना घर सोडले तर वाहने चार्जींगसाठी शहरात कोठेच व्यवस्था नाही. त्यामुळे इच्छा असूनही अनेकजण ई वाहने घेत नाहीत. यासाठी महापालिकेने शहरात सागरपार्क व बहिणाबाई उद्यान येथे चार्जीग स्टेशन उभारण्याचे निश्चित केले होते.
कार्यादेश दिलेत
बहिणाबाई उद्यान व सागरपार्क येथे ई दुचाकी, रिक्ष्ाा व कार चार्जींगसाठी चार्जीग पाँईंट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी तेथे स्वतंत्र असा वीज पुरवठा, चार्जींग पाँईट तयार करण्यात येणार आहे. याबाबतचे कार्यादेश मक्तेदारास दिले आहेत.
सशुल्क चार्जीग
चार्जींग स्टेशनला वाहन चार्जींगसाठी लावल्यानंतर जेवढी वीज वापरली जाईल त्यानुसार त्याचे पैसे द्यावे लागणार आहे.
ई बस सेवाचा आराखडा केंद्राकडे
शहरात पीएम ई बस योजनेतंर्गत लवकरच शहर ई बस सेवा सुरू होणार आहे. महापालिकेच्या मेहरुण तलावाजवळील प्रभाग समितीच्या कार्यालयात ई बस डेपो तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा केंद्र सरकारला ईमेलव्दारे पाठविण्यात आला आहे. त्या आराखड्यास मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष्ाात कामास सुरवात होणार आहे.