जळगाव ः जळगाव एमआयडीसीतील के-सेक्टरमधील कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने 67 हजारांचे साहित्य लांबवले. हा प्रकार शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आला. याप्रकरणी सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धार्थ अशोक अग्रवाल (32, शिरसोली रोड, जळगाव) यांची एमआयडीसीमधील के-सेक्टरमध्ये कागद बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल तयार करण्याची फॅक्टरी आहे. नवीनच पत्र्याचे शेड भाड्याने घेतले असून, या शेडमध्ये युनिट उभारण्याचे काम सुरू आहे.
या युनिटला उभारण्यासाठी मशीनला लागणारे सामान इलेक्ट्रिक मोटार, ईलेक्ट्रीक पाण्याची मोटार, ब्रेकर मशीन आदी साहित्य पडले असताना शुक्रवार, 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता शेडमध्ये सामान ठेवून शटरने बंद करण्यात आल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी या शेडमधून इलेक्ट्रिक मोटार, पाण्याची मोटर, इलेक्ट्रिक केबल आणि काँक्रीट ब्रेकर्स असा एकूण 67 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार 4 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊला उघडकीला आला. दरम्यान सिद्धार्थ अग्रवाल यांनी सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मुदस्सर काझी करीत आहे.