जळगाव : सर्व शासकीय कार्यालये तसेच कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर घोषित करण्यात आला आहे. यापुढे कार्यालयात किंवा कार्यालय परिसरात सिगारेट, गुटखा,तंबाखू, पान अशाप्रकारे कोणी व्यसन करताना आढळल्यास त्याला 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने 10 जुलै 2023 रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने, धुम्रपानामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतात. असंसर्गजन्य रोगामधील कर्करोग,ह्दयविकार,मानवी ह्दयाशी निगडित रोग, फुफुसांचा कर्करोग यासारखे गंभीर आजार होतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूमध्ये 8 ते 9 लाख मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने होत असतात. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यामुळे तसेच थुंकल्यामुळे त्यामधून स्वाईन फ्ल्यू, क्षयरोग, निमोनिया आणि पोटांचे विकार आदी संसर्गजन्य आजार पसरतात. जनसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून तसेच शासकीय इमारती स्वच्छ राहण्यासाठी स्वच्छ भारत स्वस्थ भारत या मोहिमेव्दारे शासकीय इमारीची साफसफाई करुन शासकीय कार्यालये व परिसर हा तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. यात तालुका आरोग्य अधिकारी सदस्य तर गटविकास अधिकारी सचिव असतील. पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, प्राचार्य, स्थानिक तरुण मंडळ, सामाजिक कार्यकर्ता, सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी हे समितीचे सदस्य असतील.