jalgaon news: खडका चौफुलीवर अपघात, दुसऱ्या तरुणाचाही मृत्यू

भुसावळ : दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून राखेची वाहतूक करणारे बल्कर रस्त्यावर बेशिस्तपणे उभे करण्यात आल्याने त्यावर भरधाव स्वीफ्ट वाहन आदळून झालेल्या अपघातात तिघे तरुण गंभीर जखमी झाले होते. हा अपघात भुसावळातील खडका चौफुलीवर गत मंगळवारी दुपारी दोन वाजता घडला होता. या अपघातात मयंक चेनसिंग मेहरा (24, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू ओढवल्यानंतर दुसरा गंभीर जखमी तरुण रोशन देविदास मकारे (22, रा. रेणुका माता मंदिर, गॅलक्सी हॉटेलमागे, भुसावळ) याचीदेखील प्राणज्योत मालवली आहे. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

खडका चौफुलीजवळ टायर फुटल्याने बल्कर टँकर (एम.एच.19 सी.वाय.7085) मंगळवार, 19 डिसेंबर रोजी  दुपारी उभा होता. बल्करचालकाने रस्त्यावर वाहन उभे करताना इंडिकेटर तसेच आजूबाजूला निशाणी लावून वाहनधारकांना सूचित करणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे घडले नाही. त्याचवेळी मोकाट कुत्रा अचानक रस्त्यात आल्याने जळगावकडे जाणारी भरधाव स्वीफ्ट (एम.एच.04 सी.टी.8610) यावेळी बल्करवर आदळल्याने तिचा मोठा चुराडा झाला. या अपघातात मयंक चेनसिंग मेहरा (24, भुसावळ) या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर दुसरा गंभीर जखमी रोशन देविदास मकारे (22, खडका रोड, भुसावळ) याच्यावर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र सहा दिवस चाललेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व सोमवारी दुपारी या तरुणाचा मृत्यू ओढवला.