Jalgaon News : गणेशोत्सवात सजावटीसाठी विविध साहित्य बाजारपेठेत दाखल

जळगाव : गणरायाच्या स्वागताला अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरल्याने बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू, साहित्यांची दुकाने ठिकठिकाणी लागली आहेत. गणेशोत्सव घरगुती असो किंवा सार्वजनिक असो. गणरायाच्या स्वागतात नाविन्यता आणण्याकडे सर्वांचा कल असतो. यंदाही गणरायाच्या स्वागतासह सजावटीसाठी आकर्षक साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी भक्तांची गर्दी होऊ लागली आहे.

बाजारपेठेत रंगीत प्लास्टिक फुलांच्या माळा, मखर, पानांची कमान, घुंगरू, लोलक, मोत्यांची तोरणे यासह वेगवेगळी सजावट दुकानांमध्ये पाहणयास मिळत आहे. ग्राहकांच्या आर्थिक क्षमतेनुसार वेगवेगळे पर्याय खुले आहेत. याविषयी सजावटीचे साहित्य विक्रेते हरिष वाणी यांनी माहिती दिली.

यंदाही बाजारपेठेत नेहमीप्रमाणे सजावटीचे सामान आले आहे. याशिवाय कार्निशियनची कापडी फुले आली आहेत. याशिवाय मोत्यांची समई, मोत्यांचे कलश, मोत्यांचे मोदक, मोत्यांचा पडदा आदी सामानासह केळीचे कृत्रीम पान, असे विविध पर्याय पाच रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे वाणी यांनी सांगितले.

याशिवाय खणाचा पडदा, डिजिटल नक्षीदार पडदे, कापडाच्या तसेच प्लास्टिकच्या शोभेच्या वस्तू, दिव्यांच्या माळा, तयार रांगोळ्या असे विविध प्रकारचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध आहे. देवाची वस्त्रे, आसन, मागील पडदे याला ग्राहकांकडून मागणी आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश सजावटीसाठी बाजारपेठेत अनेक नवीन वस्तू आल्या आहेत. एका दिवसानंतर त्यात अधिक भर पडेल, असे विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे. सजावट साहित्य घेताना काही जण फक्त यंदाच्या वर्षाचा विचार करतात तर, काही जण आज घेतलेल्या साहित्याचा पुढील गणेशोत्सवातही उपयोग करता येईल काय, हेही जाणून घेत आहेत.

असे आहेत सजावट साहित्यांचे भाव
आसन २५० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्द आहेत. फुलांच्या माळा, मखर, पानांची कमान, घुंगरू, लोलक, मोत्यांची तोरणे हे १५०  ते ८०० रुपयांपर्यंत उपलब्द आहेत. खणाचा पडदा, डिजिटल नक्षीदार पडदे, कापडाच्या तसेच प्लास्टिकच्या शोभेच्या वस्तू, दिव्यांच्या माळा या १५०० ते ३००० रुपयांपर्यंत उपलब्द आहेत.