जळगाव : महापालिकेने गाळे हस्तांतरणाबाबतचे धोरण न ठरवल्याने व्यापारी संकुलातील अनेकांनी परवानगी न घेता व हस्तांतरण शुल्क न भरता गाळ्याचे परस्पर हस्तांतरण केले होते. ही हस्तांतरणाची प्रकिया अधिकृत करण्यासाठी मनपाने नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार सदर गाळेधारकांनी शुल्क भरून प्रक्रिया पूर्ण केली आहे. यातून मनपाला 2 कोटी 60 लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. महानगरपालिकेची पूर्व परवानगी तसेच मान्यता न घेता परस्पर गाळे हस्तांतरण करणाऱ्या 305 जणांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. मुदतीत विहित शुल्क भरुन गाळे नियमित केले नाहीत तर गाळे सील केले जाणार आहेत. दरम्यान, कारवाईच्या भीतीने 172 जणांनी विहित शुल्क भरुन गाळे नियमित करुन घेतले आहेत. त्यातून महापालिकेला 2 कोटी 60 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.
सन 2013 पासून महापालिकेच्या व्यापारी संकुलामधील गाळे हस्तांतरणाची प्रक्रिया बंद होती. मनपाकडून हस्तांतरणाचे धोरण निश्चित होत नसल्यामुळे अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे परस्पर गाळे हस्तांतरीत करून घेतले होते. त्यामुळे त्या गाळेधारकांना महापालिकेने नोटीसा पाठवून आपापल्या गाळ्यांचे अधिकृतपणे हस्तांतरण करून द्यावे, अशा सूचना केल्या आहेत. मार्च महिन्यात झालेल्या महासभेतही गाळे हस्तांतरणाचा विषय गाजला होता. बेकायदेशीपणे हस्तांतरण करणाऱ्या गाळेधारकांवर दंडाची कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. ही रक्कम पाहत माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दंड माफ करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी मनपाचे नुकसान पाहता असे करणे उचित ठरणार नाही. मात्र सहा महिन्याची मुदत दिली होती. या सहा महिन्यात गाळेधारकांनी नियमात राहून प्रक्रिया करुन घेतली तर दंड माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सहा महिन्यानंतर प्रत्येक गाळेधारकाला 25 हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय झाला होता. तसा ठरावही पालिकेने पारित केला होता. आता महानगरपालिकेकडून बी.जे.मार्केट व गोलाणी मार्केटमधील 305 गाळेधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून गाळेधारकांनी आपले गाळे अधिकृतपणे हस्तांतरीत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यातील 172 जणांनी ही प्रक्रिया पूर्ण केली, परंतु तरी देखील काही गाळेधारकांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मुदत संपल्यानंतर गाळे सील केले जाणार आहेत.