भुसावळ : भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या उड्डाणपूलाखाली धारदार चॉपरच्या धाकावर दहशत निर्माण करणाऱ्या संशयिताला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अटक केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख कासीम शेख सलीम (22, पापानगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भुसावळ शहरातील खडका चौफुलीच्या उड्डाण पुलाखाली एक तरुण हातात लोखंडी धारदार चॉपर घेऊन परीसरात दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्याने त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. बाजारपेठचे पोलिस कॉन्स्टेबल सचिन चौधरी आणि पोलिस हेड कॉन्स्टेबल भूषण जैतकर यांनी कारवाई करीत गुरुवारी सायंकाळी सहा वाजता संशयित आरोपी शेख कासीम शेख सलीम (22, पापा नगर, भुसावळ) याला अटक केली. त्याच्याकडून 11 इंची लांबीचा धारदार चॉपर हस्तगत जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सचिन चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख कासिम शेख सलीम याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल भूषण जैतकर करीत आहे.