जळगाव : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील लहासर जंगलामध्ये पोत्यात बांधून एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनं जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जामनेर बोदवड रोडवरील लहासर जंगलात सोमवारी दुपारी पोत्यात बांधलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. लहासर शिवारातील जंगलात दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. यावेळी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एका पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला. ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधला. त्यानंतर जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत तात्काळ घटनास्थळ गाठले.
बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याचे तपासणीत तसेच पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. साधारणात एक महिन्यापूर्वी संबंधिताचा खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मारेकऱ्यांनी खून करुन मृतदेह पोत्यात भरुन त्याला जंगलात फेकून त्याची विल्हेवाट लावली असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. घटनास्थळी चाळीसगाव आणि पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी सुमारे पाच किलोमीटरचा परिसर पिंजून काढला. मात्र, मयत व्यक्तीबाबत कुठलीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. पोत्यात आढळून आलेला मृतदेह हा पुरूषाचा की महिलेचा याबाबत वैद्यकीय तज्ञ सुध्दा ठामपणे कुठलाही निष्कर्ष काढू शकत नसल्याने पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे. मयताचे अंदाजे वय हे ४० ते ४५ असून मयताचे दात पूर्णपणे शाबूत आहे. त्याच्या अंतर्वस्त्रावरुन ओळख पटू शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. मयत पुरूष की महिला, तसेच त्याची ओळख पटविण्यासाठी मयताच्या डीएनए चाचणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या व्यक्तींचीही पडताळणी केली जात आहे.
जामनेर तालुक्यातील जांभूळ येथील खूनाच्या घटनेचा उलगडा अद्याप झालेला नाही. घटनेला तब्बल दोन महिने उलटले आहेत. मात्र, पोलिसांना अद्यापही मयताचा मृतदेह सापडलेला नाही. या गुन्ह्यात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने खूनाची कबूली सुध्दा दिली आहे. आता पोलिसांना जंगलात सापडलेला मृतदेहाशी आणि जांभूळ येथील मयत व्यक्तीचे काही धागेदोरे लागतात का? या दृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरु आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यावरच याबाबत स्पष्ट काय ते सांगता येईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे.