Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारीत होणार ‘महासंस्कृती महोत्सव’

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात फेब्रुवारी २०२४ या महिन्यात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात पाच दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची जळगावकरांना मेजवानी लाभणार आहे. खान्देशमधील स्थानिक कलाकारांना‌ या महोत्सवात व्यासपीठ मिळावे यासाठी स्थानिक‌‌ लोक कलाकारांना या महोत्सवात सहभागी करून घ्यावे. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.‌

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात‌ फेब्रुवारी २०२४ या महिन्यात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या‌ महोत्सवाच्या नियोजनाची बैठक राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.‌ याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे तसेच जिल्ह्यातील विविध विभागांचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले की, नागरिकांना सोयीचे ठरतील अशा मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. साधारणत: फेब्रुवारी महिन्याच्या १५ ते १९ फेब्रुवारी २०२४ दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे.‌ चला हवा येवू द्या, महाराष्ट्राची हास्य जत्रा, सारेगमप, इंडियन आयडॉल मधील कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी करावी.

महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन नीटनेटके व यशस्वी होण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवत काम करावे. अशा सूचना ही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मराठा समाज व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षण आढावा

शासनाच्या वतीने आजपासून सुरू असलेल्या मराठा व खुला प्रवर्ग आरक्षण सर्वेक्षणाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीचे पालकमंत्र्यांपुढे सादरीकरण केले. सर्वेक्षणात कोणताही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. यासाठी सर्वेक्षणात सहभागी सर्वेक्षक, प्रगणक व नोडल अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.