जळगाव : जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे रब्बी हंगाम देखील हातातून निघून जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देवून नुकसानग्रस्त पीकांची पाहणी केली.
जळगावसह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ तसेच ऊन-सावलीचे वातारण होते. सोमवारी रात्री जळगावसह जिल्ह्यात काही भागांत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी गारपीट झाली. खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेले असताना अद्यापही शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच पुन्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांनी कापणी व काढणीची कामे हाती घेतली होती. त्यात हे अस्मानी संकट उभे राहिले आहे.
धरणगाव तालुक्यातील भोणेसह परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तेथे गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. मंगळवार, 27 रोजी शेतकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील गंगापुरी, पष्टाणे, भोणे, पिंपळे, निशाणे परिसरात शेतबांधावर पाहणी केली. शेतकऱ्यांसह तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, कृषी अधिकारी देशमाने यांना नुकसान भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन देत चर्चाही केली. याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, ॲड. शरद माळी, भागवत चौधरी, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विजय पाटील यांच्यासह गंगापुरी, निशाणे, पिंपळे, भोणे, धानोरा, धरणगाव येथील शेतकरी हेमंत पाटील, गुलाबराव पाटील, अधिकार पाटील, संतोष पाटील, विकास पाटील, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, नितीन पाटील, कोमल कोळी, संतोष सोनवणे, नंदलाल पाटील, राजेंद्र कोळी, दीनानाथ चव्हाण, शरद पाटील, विनोद पाटील, केशव पाटील, निवृत्ती पाटील, भीमराव पाटील, सुनील पाटील, मगन पाटील, आधार पाटील, छगन पाटील, राजेंद्र पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
.चाळीसगाव तालुक्यात अवकाळीसह गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात दुष्काळ जाहीर झालेला असून या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, कांद्याचे नुकसान झाले आहे. वादळामुळे लिंबू व शेवग्याचा फुलोरा पडून नुकसान झाले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागात पाहणी केली. पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी चित्तेगावचे सरपंच शेखर देशमुख व शेतकऱ्यांनी केली. तातडीने पंचनामे करणार असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.
पारोळा तालुक्यातील मोंढाळे, बोळे, करमाड, तामसवाडी, पिंपरी, आडगाव, शिरसोदे, बहादरपूर, विचखेडे, उंदीरखेडे, शिरसमणी, टिटवी परिसराला अवकाळी पावसाने झोडपले. तासभर गारपीट सुरू होती.
अमळनेर तालुक्यातील सडावण, टाकरखेडा, पातोंडा परिसरात गारपीट झाली. चोपडा तालुक्यातील निमगाव, तांदलवाडी, दोंदवाडे, चहार्डी, हातेड यांसह इतर भागांत गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे, तहसीलदार बाळासाहेब थोरात आदींनी केली.
रावेर तालुक्यातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. एरंडोल तालुक्यातील आडगाव परिसरात तुरळक अवकाळी पाऊस झाला. मात्र, नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.पारोळा तालुक्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानीची उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांनी विविध प्रक्षेत्रांत भेटी देऊन पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आले आहेत.