जळगाव : मार्च महिन्याच्या सुरुवातीला खानदेशात विशेषतः जळगाव जिल्ह्यात गारपीट, बेमोसमी पावसाच्या हजेरीमुळे तापमानात घट झाली होती. परंतु 12 मार्च नंतर तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्यस्थितीत आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी तापमान @ 38° वर नोंदवले गेले असून आगामी सप्ताहात किमान 42 अंशाचा टप्पा गाठण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
जळगाव जिल्ह्यात तापमान मार्च महिन्यात 38 ते 40 अंशाचा टप्पा नेहमीच गाठते. यावर्षी देखील मार्चच्या तिसऱ्या सप्ताहात तापमान 38 अंशावर स्थिरावले असून सकाळी 32ते 34 अंश तर दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत 38 अंशावर पारा स्थिरावतो. यामुळे 12 ते 3/4 वाजेदरम्यान उन्हाची तीव्रता जाणवत आहे.
बेमोसमी पावसामुळे काही अंशी घट
यावर्षी डिसेंबर व फेब्रुवारी दरम्यान एक दोन वेळा बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यात ढगाळ वातावरणामुळे काही दिवस तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. गेल्या वर्षी 6 ते 10 मार्च दरम्यान 16 अंश तापमान होते.
कमी पर्जन्यामुळे हवामान कोरडे
यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी झाले होते. त्यामुळे हिवाळा तसा जाणवला नाही. परंतु जानेवारी ओलांडताच तापमानात बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उष्माघात टाळण्यासाठी मार्गदर्शक फलक
जिल्हा प्रशासनाकडून उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानाची तीव्रता पाहता उष्माघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयी बस स्थानक, रेल्वे स्टेशन वर वेळोवेळी ध्वनिक्षेपक द्वारे सूचना दिल्या जात आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वाराजवळ मार्गदर्शक फलक लावले आहेत.
दुपारी 2 वाजेपूर्वीच कामे आटोपण्याची मजुरांकडून लगबग
कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस एवढे मागील दोन दिवस राहिले आहे. दुपारी १२ ते ३ यादरम्यान उन्हाचा चटकाही जाणवत आहे. परंतु दुपारी पाच सहा वाजेनंतर तापमान काही अंशी खाली येत आहे. सध्या शेतीकामे सकाळी १० ते दुपारी ५ यादरम्यान सुरू आहेत. आगामी दिवसात जसजशी उष्णता वाढेल, तसे शेतीकामे मजूर तसेच शेतकरी वर्गाकडून सकाळी ८ ते दुपारी २ वाजेच्या अगोदरच उरकण्याची शक्यता आहे.
राज्यात सर्वदूर उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. सध्या खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात दादर, उन्हाळी ज्वारी, बाजरी, हरभरा, मका आदी रब्बी हंगामातील पिकांची कापणी व मळणीची कामे सुरू आहेत. तसेच केळी, पपई लागवडीसाठी जमीन मशागत कामे केली जात आहेत. तर कांदे बाग लागवडी खालील क्षेत्रात आंतरमशागत, तणनियंत्रण आदी कामांनाही गती आली आहे. जिल्ह्यात केळी व पपईची काढणी मध्यंतरी गारपीट व वादळी पावसाने रखडली होती. ही काढणीदेखील सध्या वेगात सुरू असून बऱ्याच ठिकाणी बाजार समित्यात मळणी झालेल्या रब्बी उत्पादनाची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
हवामान बदलामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या उष्ण हवेला काहीसा ब्रेक
जिल्ह्यात 19 ते 24 मार्च दरम्यान कमाल तापमान 38 ते 40° डिग्रीपर्यंत राहण्याची शक्यता आहे. पूर्व आणि मध्य भारतातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण हवेला काहीसा ब्रेक लागला होता. मात्र 24 मार्च नंतर तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. 24 मार्च पर्यंत रोज थोड्याशा फरकाने पुढील काही दिवसांमध्ये हवेच्या गतीमध्ये देखील वाढ होईल हवेची कमाल गती 35 ते 40 किमी ताशी तर किमान गती 9 ते 15 किमी ताशी राहण्याची शक्यता आहे.