Jalgaon News : जोरदार पाऊस; मजुराच्या घरासह दोन लाख वाहून गेले, पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू

जळगाव : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काल सोमवारी वाघूर नदीला मोठ्या प्रमाणावर पुर आला. यामुळे हिवरी दिगर (ता. जामनेर) गावातील नदी काठची पाच घरे वाहून गेली. यात मन्सूर जाफर तडवी या मजुराचे पेटीत ठेवलेले पावणे दोन लाख रुपयेही इतर वस्तूंसोबत वाहून गेले. यामुळे तडवी हतबल झाले आहेत.

केळीबागा उद्ध्वस्त
वाघूर नदी काठच्या केळी बागांमध्ये पाणी शिरल्याने पिंपळगाव येथील दोन तर, हिवरी दिगर येथील दोन शेतकऱ्यांच्या केळी बागा व कापूस पीक पूर्ण वाहून गेले. इतर शेतीचे देखील नुकसान झाले आहे.

पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू
जिल्ह्यात काल सोमवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यात जामनेर तालुक्यातील एकाचा तर बोदवड तालुक्यातील एकाचा समावेश आहे. शहापूर (ता. जामनेर) येथील मोहन पंडित सूर्यवंशी (४०) हे खडकी नदीच्या जवळ गेले असता, अचानक पुराच्या पाण्यात वाहून गेले. आपत्कालीन बचाव पथकाला कळविण्यात आले. त्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत ते मिळून आले नाहीत. त्यामुळे सकाळी युद्धपातळीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दुसऱ्या दुर्घटनेत बोदवड तालुक्यातील हरणखेड येथे शेतकरी गोपाल प्रभाकर वांगेकर (२८) हे बैल धुण्यासाठी नदीत उतरले. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते बैलासह पाण्यात वाहून गेले. मृतदेह नदीतील झुडपांमध्ये एनडीआरएफच्या पथकाने बोटीच्या साहाय्याने शोधून काढला. मात्र  बैल सापडला नाही. या दुर्घटनेने दोन्ही हरणखेड गावात पोळा सण साजरा झाला नाही. शेतकरी गोपाळ वांगेकर याच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार असून दोन एकर शेती आहे.