जळगाव : कुत्र्याने ट्रॅक्टरचे सीट फाडल्याच्या संशयातून एका विकृताने कुत्र्याला थेट फाशी देऊन मारल्याचा धक्कादायक तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने प्राणीमित्रांकडून संताप व्यक्त होत आहे.
पारोळा तालुक्यातील बहादरपूर गावी संशयित आरोपी दिलीप भिमराव पारधी याने गावातील मोकाट फिरणाऱ्या काळ्या रंगाच्या कुत्र्यास बेदम मारहाण केली. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवरील लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकवून त्यांनी कुत्र्याला फाशी दिली आहे. यानंतर कुत्र्याला ट्रॅक्टरला बांधून ओढत फरफतट नेत नाल्यात फेकून दिल्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.
रोज ट्रॅक्टरखाली हा कुत्रा बसो आणि त्याने ट्रॅक्टरचं सीट फाडलं, या रागातून दिलीप पारधी याने हा प्रकार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.