जळगाव : कारची तोडफोड प्रकरणातून उद्भवलेल्या वादात पोलीस कर्मचारी महिलेने डॉक्टरला हाताबुक्क्याने मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या कर्मचारी महिलेस तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले. रविवार, 29 रोजी सकाळी दहा वाजता एका रुग्णाची शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. नीरज चौधरी तसेच त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे असे कारने निलकमल हॉस्पिटल येथे आले. समोर रस्त्याच्या बाजूला कार पार्किंग करून डॉ.चौधरी यांचेसह तिघे हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. त्यानंतर एका तरुणाने कारजवळ नारळ विक्रीची लोटगाडी लावत कारची तोडफोड केली. पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेने याठिकाणी येत डॉक्टरला हाताबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी डॉ.चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला कर्मचारी डॉक्टरला मारहाण करत असल्याचे चित्रण कैद झाले. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी या कर्मचारी महिलेस तत्काळ निलंबन केल्याचे आदेश सोमवार, 30 रोजी काढले. तसेच कर्मचारी महिलेची विभागीय चौकशीचे आदेश दिले.