Jalgaon News : ‘तुम्हाला बाबांनी बोलवलं’ म्हणत लक्ष विचलित केलं अन् साधला डाव, काय घडलं?

जळगाव : बँकेत पैसे भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाच्या हातातील पैशाची बॅग भामट्यांनी लंपास केल्याची घटना चाळीसगावात घडली. बागेत सुमारे दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चाळीगाव तालुक्यातील देवळी येथील पैठणी उत्पादक माधव पदमाकर रणदिवे हे शुक्रवार, 4 रोजी दुपारी 1.33 वाजेच्या सुमारास स्टेशन रोडवरील सेंट्रल बँकेत सुमारे दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांचे वडील बँकेबाहेर कारमध्ये थांबले होते. सेंट्रल बँकेतून स्लीप घेऊन रकमेचा तपशील भरत असताना क्रीम रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट घातलेला इसम माधव रणदिवे यांच्याजवळ आला व तुम्हाला बाबांनी गाडीत बोलावले आहे, असे सांगितले.

वडिलांनी बोलावले असेल म्हणून माधव रणदिवे हे बँकेतून बाहेर पडून वडिल बसलेल्या कारकडे जात असतानाच एक काळ्या रंगाची मोटार सायकलसमोर आली व त्यावरील दोन इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने रणदिवे यांच्या हातातील पैशाची बॅग हिसकावून छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने पळ काढला. त्यांच्यामागोमाग बँकेत आलेला त्या इसमानेही पळ काढला. या बॅगेत दोन लाखांची रोकड होती.

गर्दीचा फायदा घेत भामटे पसार
काही क्षणात घडलेल्या या प्रकाराने रणदिवे यांनी चोर चोर म्हणून पळाले, पण भामटे गर्दीचा फायदा घेऊन कोणत्यातरी रस्त्याने निघुन गेले. रणदिवे यांनी तडक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना लुटीची माहिती दिली. याप्रकरणी रणदिवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.