जळगाव : बारमध्ये गणवेशातच बसून तर्रर्र झालेल्या पोलिसांमध्ये जोरदार वाद होऊन आपसात हाणामारी झाल्याची घटना रविवार, २५ रोजी भास्कर मार्केट परिसरात घडली होती. दरम्यान, घडलेल्या प्रकाराची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दखल घेतली असून, त्या कर्मचाऱ्याचे निलंबन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संदीप धनगर नेमणूक मुक्ताईनगर पोलीस ठाणे असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
शहरातील भास्कर मार्केट परिसरातील एका बारमध्ये चार ते पाच पोलिस कर्मचारी रविवार, २५ रोजी सायंकाळी ६ वाजता आले. ते गणवेशातच होते व वर जॅकेट घातले होते. सुरुवातीला मद्यपान केल्यानंतर ते निघून गेले. मात्र, काही वेळाने परत तेथे आले व पुन्हा मद्यपान केले. बारमध्ये बसलेले असतानाच तेथे दोन ग्लास त्यांनी फोडले. त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजेदरम्यान बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाले. हा वाद वाढतच जाऊन तिघे जण एकमेकांना भिडले व चांगलीच पकडापकडी झाली. त्यात एक जण तर चिखलातही पडला होता.
हे कर्मचारी कारमध्ये (क्र.एमएच ०२, ईएच १०४८) बसले व ती काढत असताना दोन दुचाकींना धक्का दिल्याने त्या खाली पडल्या. या कारवर पोलिसांचा लोगो आहे. त्यानंतर कशीबशी कार काढली व रस्त्याला लागल्यानंतर समोर एका सायकलस्वार मुलाला धडक दिली. त्यात तो मुलगा खाली पडला तरीदेखील न थांबता कारचालक भरधाव वेगाने पसार झाला. हा सर्व प्रकार बारसह आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता. सुदैवाने सायकलस्वार मुलाला कुठलीही दुखापत झाली नाही.
वाद एकाचा दोघांनी त्याला आवरले
हॉटेल बाहेर वाद होत असल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलिसांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली होती. पोलिसांनी माहिती घेतली असता संदीप धनगर नामक कर्मचारी हॉटेलमध्ये आणि बाहेर वाद घालत होता. इतर दोघे कर्मचारी त्याची समजूत काढत होते तर त्याला आवर घालत होते मात्र तरीही तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
निलंबन करुन चौकशी लागणार
हॉटेलमध्ये बसलेले कर्मचारी बंदोबस्त आटोपून त्याठिकाणी बसलेले होते. वाद घालणारा कर्मचारी पोशाख घालून असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणाची वैयक्तिक चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.