खामगाव: शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय थाटणारे वीरेंद्र सुरजितसिंग व सय्यद सिकंदर सय्यद अफसर या दोन बोगस डॉक्टरांना रंगेहात पकडले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.शिवाजीनगर पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, हरयाणा येथील वीरेंद्र सुरजितसिंग व बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट येथील सय्यद सिकंदर सय्यद अफसर हे दोघे सजनपुरीजवळील ढाब्याजवळ सय्यद सादिक सय्यद गफार यांच्या घरात रुग्णांची तपासणी व औषधोपचार करीत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा मारला. त्यावेळी रुग्णाला सलाईन लावल्याचे दिसले. काही रुग्ण औषधोपचारासाठी आल्याचे दिसले. त्यांच्यावर दोघेजण उपचार करीत होते. त्यांना वैद्यकीय अर्हता प्रमाणपत्राची मागणी केली असता ते नसल्याचे पोलिसांना सांगितले. एकाकडे रोख ३३,६०० रुपये, मोबाईल तर दुस-याकडे मोबाईल, बिट्टसिंग महेंद्रसिंग या नावाचे पॅरामेडिकल कौन्सलिंग, पंजाबचे डिप्लोमा प्रमाणपत्र, डिप्लोमा इन आयुर्वेदिक फार्मसी प्रमाणपत्र व इतर साहित्य, असा एकूण ४९,६०० रुपयांचा मुद्देमाल सापडला.