जळगाव : धावत्या रेल्वेतून तोल जावून खाली पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सोमवार, १५ रोजी ८.३० वाजेनंतर ही घटना जळगाव रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी काही अंतरावर घडली. त्याच्या सोबत असलेल्या तरुणाशी लोहमार्ग पोलिसांनी चौकशी केल्यानंतर या तरुणाची ओळख पटली. लोकेश रेवेराज मराठे असे मृताचे नाव आहे.सोमवारी तो नाशिक येथून एका सहकारी तरुणाच्या सोबत भुसावळकडे रेल्वेतून प्रवास करत होता. डब्याच्या गेटवर दोघे बसले होते.
दरम्यान जळगाव रेल्वे स्टेशन येण्याच्या पूर्वी डुलकी आल्याने तोल जावून तो खाली पडला. डोक्याला जबर दुपापत होवून तो बेशुध्द झाला. खबर मिळताच लोहमार्ग पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन भावसार, पोलीस नाईक नरेंद्र चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली.रुग्णवाहिकेतून या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले असता तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक नरेंद्र चौधरी करत आहेत. या तरुणाच्या अपघाती मृत्यूची वार्ता कळाल्यानंतर बामणोद सह आश्रमात हळहळ व्यक्त करण्यात आली. कष्ट करुन जीवनाची वाटचाल करायची, अशी लोकेश याची धारणा होती. आश्रमात झालेल्या संस्काराप्रमाणे त्याची वागणुक होती.
महानुभाव पंथ आश्रमाचा आधार सुत्रांच्या माहितीनुसार, लोकेश याचे बाल्यावस्थेत वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर तो दोन वर्षाचा असताना त्याच्या आईने त्याला बामणोद येथील महानुभव पंथ आश्रमाच्या स्वाधीन केले. लोकेश याला आश्रमात आधार मिळाला. याठिकाणीच तो लहानाचा मोठा झाला. दरम्यान त्याच्या गुरुंचे निधन झाले. त्यामुळे मिळेल ते काम करुन तो स्वतःचा उदरनिर्वाह करु लागला होता. मयताची काकू रुग्णालयात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर रोझादा येथे या तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.