Jalgaon News: नफ्याचे आमिष, निवृत्त पोलिसाला लुटले

जळगाव : कंपनीतर्फे सोन्याचे कॉईन घेतल्यास त्या आयडीवर दरमहा भरपूर लाभ मिळेल, असे सांगून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याकडून ३ लाख १ हजार रूपये गंडवून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पुरूषोत्तम सुपडू लोहार (६३) हे कुटुंबासह मयूर कॉलनी पिंप्राळा याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात प्रदीर्घ काळ सेवा बजावली असून, ते सेवानिवृत्त आहेत. जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२३ पावेतो भय्या पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) तसेच त्याचा साथीदार कामता एस सोनी (रा. मुंबई) या दोघांनी कंपनीकडून सोन्याचे कॉईन घेतल्यास त्या आयडीवर ठराविक रक्कम दरमहा मोठा आर्थिक लाभ मिळेल, असे आमिष दाखवून संशयितांनी विश्वास संपादन केला.

सुरुवातीला तीन-चार महिने त्यांनी मोबदलाही दिला. त्यानंतर पेन्शची रक्कम रूपये ३ लाख १हजार रूपये घेऊन संशयितांनी पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुरुषोत्तम लोहार यांनी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून कैफियत मांडली. याप्रकरणी तक्रारीवरून संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि प्रदीप हे करीत आहेत.

सुरुवातीला दिला परतावा, मग गुंडाळला गाशा

सुरुवातीला लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी दर महिन्याला पाच पाच हजार रूपये अदा करण्याची भन्नाट आयडीया राबविली.

दर महिन्याला कंपनी पैशांचा परतावा देत आहे आणि मुदतीनंतर संपूर्ण रक्कम मिळेल अशी दिलेले आमिष त्यांनी लोकांच्या मनावर बिंबविले असंख्य लोकांनी या कंपनीत पैसे गुंतविले. पुरुषोत्तम लोहार यांच्याकडीलही निवृत्तीचे रू. ३ लाख १ हजार रूपये त्यांनी चेकने घेतले. प्रचंड रक्कमा जमा केल्यानंतर कंपनीला बंद करून संशयितांनी पलायन केले.