भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील टोल नाक्यावर कार चालकांची फसगत होत असून प्रश्न करणाऱ्या वाहनधारकांशी तेथील कर्मचारी वर्ग अरेरावी करत असल्याच्या तक्रारी आहेत.खासगी वाहनांना टोल लागत नाही असा शासन निर्णय आहे. तरीही सक्तीची वसूली नशिराबाद येथील टोल नाक्यावर केली जात असल्यामुळे मनसेतर्फे मंगळवारी आंदोलन करण्यात आले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अनेक वाहने या ठिकाणाहून सोडली मात्र कार्यकर्ते या ठिकाणांहून रवाना होताच पुन्हा सक्तीची वसूली सुरू झाली.
अनेकांचा वाद भुसावळकडून जळगावकडे रोज शेकडो खासगी वाहने येत असतात. स्थानिक वाहनधारक घाईत असल्याचा पुरेपुर फायदा नशिराबाद जवळील टोल नाक्यावर घेतला जात असतो. त्याची प्रचिती मंगळवारी दुपारनंतर अनेक वाहनधारकांना आली. टोल नाक्यावरील कर्मचारी घोळक्याने उभे राहून वाहनधारकांशी अरेरावी करत होते. यातही काही जणांनी नियम सांगितला असता त्यांना चुकीचे मार्गदर्शन याठिकाणी केले जात होते. खासगी वाहनांवर फास्टट्रॅक असल्याने पैसे कापले जात होते यावर काही जणांना प्रश्न केला असता तुम्ही दुसऱ्या मार्गाने जायला पाहीजे होते असे उत्तर मिळत होते. नागरिकांनी नियम सांगितला असता त्यांना धमकावण्याचे प्रकार या ठिकाणी झाले.
प्रशासनाकडून दखल गरजेची
खासगी चारचाकी वाहनांबाबत सूचना असताना त्याकडे टोल नाक्यावर दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात येत आहे. वाहनधारक घाईत असल्याचा पुरेपुर फायदा घेऊन असे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आता या ठिकाणी येत आहेत. याप्रश्नी जिल्हा प्रशासनाने तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने कारवाई करावी अशी अपेक्षा जळगाव व भुसावळ परिसरातील वाहनधारकांकडून केली जात आहे.