Jalgaon News: नादुरुस्त असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकीची धडक, युवक ठार

एरंडोल : येथून खडकेसिम येथे दुचाकीने परत जात असताना रस्त्याच्या कडेला उभे असलेले नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकीची धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कासोदा रस्त्यावर घडली. त्यात दुचाकीस्वार प्रणय जितेंद्र पाटील (वय २३ वर्षे) (रा. खडकेसिम) हा युवक गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान शनिवारी त्याचे निधन झाले.

प्रणय हा जळगाव येथे रायसोनी महाविद्यालयात बीटेकला शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो एरंडोल -येथे व्यायाम शाळेत व्यायामासाठी आला होता. घरी परत जात असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. प्रणय पाटील हा एम.एच. १९ इजे २४३८ क्रमांकाच्या दुचाकीने एरंडोल येथून खडकेसिम येथे कासोदा रस्त्याने

घरी परत जात होता. कुंदन परदेशी यांच्या शेताजवळ रस्त्याच्या कडेला नादुरुस्त एम एच १९ बीजी ५१७० क्रमांकाचे ट्रॅक्टर उभे होते. त्यास रिफ्लेक्टर, इंडिकेटर लावले नव्हते. तसेच कोणत्याही सुरक्षेतेची दखल न घेतल्याने ट्रॅक्टर चालकाच्या बेजबाबदारपणे प्रणय याच्या डोक्यात व छातीस जबर दुखापत झाली. औषधोपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार देशमुख, अनिल पाटील, अखिल मुजावर, मिलिंद कुमावत करीत आहेत