मुक्ताईनगर : कृषी महामंडळ अथवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषाने मुक्ताईनगर तालुक्यातील भोकरीच्या २५ वर्षीय तरुणाची साडेतेरा लाखात फसवणूक झाली होती. याप्रकरणी सुरूवातीला एका संशयिताला अटक करण्यात आल्यानंतर या प्रकरणात अमरावतीच्या परीक्षा घेणाऱ्या – संशयिताला मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. सचिन रवींद्र वानखेडे (४६, अमरावती) असे – संशयिताचे नाव आहे. संशयिताला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, संशयीत सचिन वानखेडे यांनी जळगावात परीक्षा घेताना फेरफार केल्याचा आरोप आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
फकिरा अर्जुन सावकारे (२५, भोकरी, ता. मुक्ताईनगर) या तरुणाची प्रमोद शांताराम सावदेकर (रा.जळगाव) सोबत ओळख झाल्यानंतर त्याने राजकीय लोकांशी ओळख असल्याचे सांगत जळगाव कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय कार्यालय या विभागात सहाय्यक व्यावस्थापक या पदावर किंवा जळगाव दुध फेडरेशनमध्ये टेक्निशियन फिटर या पदावर नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक केली होती.
संशयिताचे सांगितल्यानंतर दुध फेडरेशनमध्ये पेपर देण्यात आला मात्र नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याची खात्री होताच गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात एका संशयिताला अटक केल्यानंतर त्याने कबुली जवाबात जळगावातील परीक्षेत अमरावतीच्या परीक्षा संचालकाने फेरफार केल्याची माहिती दिल्यानंतर सचिन रवींद्र वानखेडे (४६, अमरावती) यास अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.