जळगाव : राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. जळगाव जिल्हयात देखील बुधवार, ५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नदी-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. यामुळे मोठी हानी झाली आहे तर रावेर तालुक्यात दोन व्यक्ती बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, शोध मोहीम सुरु असल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
रावेर तालुक्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला. यानंतर दोन ते तीन तास मुसळधार पाऊसाने तांडव केला. यामुळे शहरातील नागझिरी नदी, मात्रान नदी, रसलपुर गाव नदीत अचानक पाणी वाढले. नागझिरी नदीत एक तर मात्रान नदीत राजकीय क्षेत्रातील एक पदाधिकारी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
रसलपुर मध्ये बलेनो चारचाकी गाडी वाहून गेली असून, गाडीतील प्रवासी उडी घेतल्याने सुदैवाने बचावले आहे. रमजीपुर येथे चार गुरे वाहून गेले असून, रसलपुर-खिरोदा गावामध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. महसूल प्रशासन तालुक्यात असून, कुठे नुकसान झाले आहे याचा शोध घेत आहे.
अनेक जण पोहचले मदत कार्याला
तहसीलदार बंडू कापसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत कार्यात सहभाग घेतला आहे. शहरात माजी नगरसेवक सूरज चौधरी आपल्या टिमसह महसूल प्रशासना सहकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून गेलेल्या दोन व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. तर रमजीपुर मध्ये सरपंच प्रकाश तायडे उपसरपंच योगिता कावडकर प्रा उमाकांत महाजन नागरीकांना मदत करत आहेत.