Jalgaon News : पावसाने हाहाःकार, अतिवृष्टीची नोंद, हतनूरचे उघडले 4 दरवाजे

जळगाव : जिल्ह्यात बुधवार, ५ रोजी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र रावेर तालुक्यात अक्षरश: हाहाःकार उडविला.  सर्वच मंडलांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. शासन दप्तरी प्रत्येक मंडलात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे तापी, पूर्णा नदीला आलेल्या पुराने हतनूर धरणातील पाणीसाठा वाढून धरणाचे चार दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील काही भागात मंगळवार व बुधवारी तुरळक पाऊस झाला. मात्र, बुधवारी रात्री व गुरुवारी पावसाने कहर केला. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसामुळे तापी, पूर्णा नद्यांना पूर आला. त्यामुळे हतनूरचा पाणीसाठा वाढून या धरणाचे ४ दरवाजे प्रत्येकी अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. त्यातून ४ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

रावेर तालुक्यात मुसळधार
रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाचा जोर वाढला. काही वेळातच ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना प्रचंड पूर आला. मूळ रावेर शहरात पाऊस कमी असला तरी सातपुड्यात प्रचंड पाऊस झाल्याने त्याचा परिणाम संपूर्ण तालुक्यावर झाला. रावेर तालुक्यातील सातही मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील पाऊस असा
जळगाव— २६.४
भुसावळ—-५.९
यावल—–४६.५
रावेर—–८५.२
चाळीसगाव—७.७
जामनेर—- २.२
पाचोरा —२०.३
भडगाव— १५.३
धरणगाव—-१८.७
मुक्ताईनगर—२८.३
बोदवड—–२४.०